अमृता वणजू-आडिवरेकर

खरं तर आत्या होणे हे खूप धाडसी काम आहे असे सर्वाना वाटते. आत्यापेक्षा मावशीचे जास्त कौतुक केले जाते. पण, आत्या म्हणजे त्या घरातील अनेक जुन्या गोष्टींना उजाळा असतो. नातवाला आजी-आजोबा नेहमी सांगतात, तुझे बाबा आणि तुझी आत्या असे करायचे.. ही यादी पण कधी संपत नाही. नाहीतरी असे म्हणतातच ना, खाण तशी माती आणि आत्या तशी भाची. भाची असो नाही तर भाचा आत्याच्या सारखे वागतात, सवयी पण तशाच असे आजी-आजोबांना वाटत असते आणि ते त्या क्षणांमुळे काही जुने दिवस जगत असतात. आत्याला तर ही भाचेकंपनी म्हणजे माहेरी येण्यासाठीचे आई-वडिलांइतकेच महत्त्वाचे कारण. पुन्हा बालपण जगण्यासाठीचे साधन.

मुलगी लग्न होऊन सासरी गेली की, माहेरचे सगळे जण आपल्याला विसरले असतील. कोणाला आपली आठवण पण येत नसेल, असे तिला वाटत असते आणि इकडे मात्र आजी-आजोबा नातवंडांना नेहमी त्याच्या बाबांच्या-आत्याच्या-काकाच्या आठवणी सांगत असतात. त्यामुळे सासरी गेलेल्या मुलीसाठी आत्या होणे म्हणजे खरं तर परत माहेर मिळणे असाच होतो.

आई आणि बाबा यापैकी आईला नेहमीच भावनिक महत्त्व दिले जाते आणि बाबांना नेहमीच कडक समजले जाते आणि हीच गोष्ट लक्षात ठेवून मावशी आणि मामा हे आत्या आणि काकांपेक्षा जवळचे वाटतात. म्हणजे काही काळापूर्वी असेच वातावरण होते. आत्या आणि काकाचा वावर आसपास असला की, दडपण यायचे. बघा ना आत्या म्हणताना आपले ओठसुद्धा जवळ येत नाहीत.

पण आता नात्यांमध्ये खूप बदल झाला आहे. आज तीच आत्या मुलांना खूप जवळची वाटू लागली आहे. आजकाल तर तिला आत्तू म्हणून संबोधले जाते आणि हे म्हणताना तोंडाचा आकार तर अगदी गोड गोड पापा मिळाल्यासारखाच असतो.

खरं तर आत्या हा शब्द आपल्याला परकेपणा नाही, तर आपलेपणाचे नाते सांगणारा ठरतो. बोबडय़ा बोलातून नातं सांधणारा ठरतो. आपण आपलं माहेर सोडून सासरी गेलो म्हणजे परत पावली आलो, तर परकेपणाचा स्पर्श तर मनाला होणार नाही ना, ही भीती असतेच, मात्र आत्या हे शब्द पुन्हा जेव्हा नात्याला जोडतात, तेव्हा ही भीती आपसूकच दूर होते. मायेचा ओलावा या नात्यातून व्यक्त होतो. या नव्या नात्यासोबत माहेरी मन रमू लागतं, भूतकाळाला पुन्हा एकदा गवसणी घालू लागतं.

हळूहळू आत्याकडेच घरातील सगळय़ांच्या तक्रारी येऊ लागतात. आत्या आणि भाचेकंपनीचा एक वेगळा गट निर्माण होतो. आत्याही या सा-या वातावरणात नकळत रमून जाते.

थँक्स त्या भाचेकंपनीला ज्यांच्यामुळे आत्याला परत माहेरी रमता येते आणि सर्वात महत्त्वाचे थँक्स त्या सर्व आत्यांना ज्यांच्यामुळे माहेरचे सगळे त्यांच्या आठवणीत खूश असतात.