सर्व वृत्तवाहिन्या, खासगी सर्व्हेक्षण कंपन्यांचे अंदाज साफ धुडकावून लावत बिहारच्या विधानसभा निवडणुकीत भाजपच मोठा भाऊ ठरला आहे. दुसरीकडे सुशांतसिंह राजपूत प्रकरणापासूनच बिहार निवडणुकीत भाजपच्या विरोधात उतरण्याची भाषा करणारी शिवसेना निवडणुकीत कुठेही दिसली नाही, इतकेच काय शिवसेनेचा महाराष्ट्रातील मित्रपक्ष असणारा राष्ट्रीय काँग्रेस बिहारमध्ये अवघ्या १९ जागा जिंकू शकला आहे. बिहारमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीत भाजप सर्वाधिक जागा मिळवून मोठा भाऊ ठरल्याने नितीशकुमारांच्या संयुक्त जनता दलाला धक्का बसला आहे. नितीशकुमारांना मुख्यमंत्रीपद दिले जाईल की त्यावर भाजप दावा करेल, याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत. मात्र यापूर्वी जाहीर झाल्यानुसार नितीशकुमारच मुख्यमंत्री होतील असे भाजपचे जाहीर केले आहे. मात्र यासाठी काहीकाळ थांबावे लागणार आहे. बिहार विधानसभा निवडणुकीप्रमाणेच मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात या राज्यांतील विधानसभा पोटनिवडणुकीतही भाजपने बाजी मारल्याचे स्पष्ट झाले. यामुळे देशभरात पुन्हा एकदा भाजपाचीच सत्ता असावी असा मतदारांनी कौल दिल्याचेच संकेत मिळत आहेत. बिहारमध्ये विधानसभ्या मागील निवडणुकीत भाजपला ५३ जागा मिळाल्या होत्या. त्यात यंदा जवळपास २० जागांची भर पडली. या यशाबद्दल बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमधील ग्रामीण-गरीब, शेतकरी-कष्टकरी, व्यापारी, दुकानदार या प्रत्येक वर्गाने रालोआच्या सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास या मूलमंत्रावर विश्वास दाखवला आहे. प्रत्येक व्यक्ती व प्रत्येक प्रदेशाच्या संतुलित विकासासाठी आम्ही नेहमीच कार्यरत राहू, असे आश्वासन बिहारच्या नागरिकांना दिले आहे. बिहारची निवडणूक अनेक अर्थाने महत्वाची आणि भाजपासाठीही उल्लेखनीय ठरली. या निवडणुकीने पुन्हा एकदा राष्ट्रीय काँग्रेसचे नेतृत्व करणा-या राहुल गांधी, प्रियंका गांधी यांना मतदारांनी साफ नाकारल्याचेच दिसून आले आहे. राहुल गांधी यांनी बिहारच्या प्रचारात बिहारमधील तसेच देशांतील समस्यांवर भाष्य करण्यापेक्षा पंतप्रधान मोदी यांच्या कार्यशैलीवर फोकस ठेवला. फक्त बिहारच नाही तर गुजरात, मध्यप्रदेश आणि उत्तरप्रदेशमधील पोट निवडणुकांमध्येही स्पष्टपणे मतदारांनी भाजपलाच बहुमत दिले आहे. कोरोना काळात झालेली बिहारची ही निवडणूक अनेक अर्थाने स्मरणात राहणारी असेल. बिहारच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असणारे लालूू प्रसाद यादव या निवडणूक काळात तुरुंगात होते, तर त्यांचा मुलग तेजस्वी यादव यांनी एकहाती प्रचार सत्र राबवून बिहारचे विरोधी पक्षनेतेपद राखले आहे. बिहारच्या राजकारणातील एक युवा नेता म्हणून या निवडणुकीत ते देशासमोर आले आहेत. दुसरीकडे लोकजनशक्ती पक्षाचे संस्थापक, दिवंगत नेते रामविलास पासवान यांचा मुलगा चिराग पासवान यांनी नितीशकुमार यांचे नेतृत्व अमान्य करून स्वतंत्र लढण्याचा निश्चय केला. निकालानंतर आपणच ‘किंगमेकर’ असू अशी काहीशी त्यांची भावना मतदारांनी नाकारली आहे. पाच पैकी फक्त एकाच जागेवर त्यांना विजय मिळाला आहे, त्यामुळे बिहारच्या सत्तेत त्यांना फारसे स्थान राहणार नाही. इथूनपुढे नितिशकुमार आणि भाजपाशी मिळते जुळते घेतच त्यांना आपला राजकीय प्रवास करावा लागणार आहे. बिहार राज्यात सध्या बेकारी, कुपोषण, गुन्हेगारी, शिक्षण, नवउद्योग निर्मिती, स्थानिकांना कायमस्वरुपी रोजगाराची हमी, कोरोनामुळे स्थलांतरीत झालेल्या लाखो मजुरांच्या हाताला काम आदी अनेक गंभीर समस्या आहेत. महिलांविषयक प्रश्नही तिथे गंभीर आहेत. गत निवडणुकांमध्ये नितीशकुमार यांनी बिहारमध्ये दारुबंदीचा निर्णय घेत महिला मतदारांची मते जिंकले होती, मात्र सरत्या काळात छुप्या मार्गाने बिहारमध्ये दारुविक्री मोठ्या प्रमाणात सुरु असल्याचा मुद्दा यंदाच्या निवडणुकीत कळीचा मुद्दा ठरला होता. कोरोना संसर्ग आणि संबंधित आरोग्यविषयक उपाययोजना, सोयी सुविधा हे विषयही बिहारी जनतेच्या जिव्हाळ्याचे विषय आहेत. बिहारमधील वाढती गुन्हेगारी हा राजकीय पक्षांसमोरीलही डोकदुखीचा विषय ठरु पाहतो आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार उमेदवाराची गुन्हेगारी पार्श्वभूमी मतदारांसमोर प्रसिध्द करण्याच्या नियमामुळे स्वच्छ प्रतिमेचे उमेदवार शोधणे सर्वच राजकीय पक्षांना जिकीरीचे बनते आहे. बिहार विधानसभा निवडणुकीत गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या तब्बल ११०० उमेदवार रिंगणात उतरले होते. निवडणूक आयोगाचे जमा केलेल्या माहितीच्या आधारे ही माहिती समोर आली. बिहार निवडणुकीत एकूण ३७३३ उमेदवार होते. पैकी ११५७ उमेदवारांना गुन्हेगारी पार्श्वभूमी होती. यातलेच अनेकजण निवडणूनही आले आहेत. बिहार प्रचारादरम्यान भाजपाच्यावतीने अनेक दिग्गज्जांच्या सभा झाल्या. महाराष्टÑाचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढली गेली. त्या विजयाने देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर आणि त्याच्या कर्तृत्वावर भाजपाच्या वरिष्ठांकडून पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे. बिहार निवडणुकांनंतर सालाबादप्रमाणे यंदाही बहुतांश वृत्तवाहिन्यांनी आणि खासगी सर्व्हेक्षणाच्या आधारे महागठबंधनला स्पष्ट बहूमत मिळेल असा दावा केला गेला. त्यावर चर्चासत्रांची मैफल रंगली, मात्र झाले उलटेच. या निकालाने मुख्यमंत्री होण्याचे तेजस्वी यादव यांचे स्वप्नच भंगले आहे. एवढेच नाही तर बिहारमध्ये भाजपाला आम्हीच संपवू अशा वल्गना करणा-या अनेकांना चोख उत्तर मिळाले आहे. बिहार विधानसभा निवडणुकीत उल्लेखनीय कामगिरी करणा-या भाजपने ११ राज्यांमधील ५८ जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकातही ४० जागा जिंकल्या आहेत. भाजपची सर्वात चांगली कामगिरी मध्य प्रदेशात झाली असून येथील २८ जागांमधील २० जागा मिळवून विधानसभेत बहुमत मजबूत केले आहे. भाजपचा आता मध्य प्रदेश विधानसभेत आकडा ११६ इतका झाला आहे. गुजरातमध्ये सर्वच्या सर्व ८ जागा भाजपने जिंकल्या. गेल्या जूनमध्ये राज्यसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या ८ आमदारांनी राजीनामे दिले होते. या ८ पैकी ५ जणांनी भाजप प्रवेश केला होता. उत्तर प्रदेशातल्या ७ जागांपैकी ६ जागा भाजपने तर १ जागा समाजवादी पार्टीने जिंकली. दरम्यान, बिहारमध्ये एनडीएला बहुमत मिळाल्यास नितीशकुमार हेच मुख्यमंत्री असतील असा शब्द आधीच जदयुने भाजप नेतृत्वाकडून घेतला आहे. आता निकालात भाजप हा मोठा भाऊ ठरल्याने व जदयुपेक्षा भाजपला ३० जागा जास्त असल्याने पुढे काय होणार, याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. बिहार व अन्य राज्यांत भाजपने चांगले यश मिळविले. त्यामुळे मोदी व भाजप यांची लोकप्रियता कायम असल्याचे स्पष्ट होते. नितीशकुमार यांच्या लोकप्रियतेला मात्र आता बिहारमध्ये आहोटी लागल्याचे दिसते. शिवाय सलग १५ वर्षे सत्तेत राहिलेल्या नितीशकुमार यांना यावेळी चिराग पासवान यांच्यामुळे मोठा फटका बसला. चिराग पासवान यांनी स्वतंत्र चूल मांडली. संपूर्ण निवडणूक प्रचारात त्यांनी स्वत:ला मोदी भक्त संबोधले आणि नितीश कुमार यांच्यावर मात्र जोरदार हल्ला चढवत राहिले. चिराग पासवान यांच्या भूमिकेमुळे किमान ४० जागांवर नितीश कुमार यांच्या उमेदवारांच्या विजयाचे गणित बिघडल्याचे दिसते. बेरोजगारी आणि कोरोनामुळे बिहारला आपल्या गावी परतलेले ४७ लाख कामगार हा तेजस्वी यांनी प्रचाराचा मुद्दा केला आणि त्याचा फायदा त्यांना मिळाला, असे दिसते. बेरोजगार तरुण आणि घरी परतलेले कामगार, त्यांची कुटुंबे यांनी नितीश यांच्या विरोधात मतदान केल्याचा अंदाज आहे. राज्यात सर्वाधिक जागा तेजस्वी यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाने मिळविल्या असल्या तरी आघाडीतील मित्रपक्ष काँग्रेसच्या सुमार कामगिरीमुळे तेजस्वी यादव यांचे मुख्यमंत्रीपद हुकले आहे. बिहारी जनतेने जंगलराज नाकारले असून नितिशकुमार यांचे नेतृत्व मान्य केल्याचा दावा फडणवीस यांनी केला आहे, तो काहीअंशी निकालाने सिध्दच केला आहे.