प्रियानी पाटील

मुलींना सक्षम आणि खंबीर बनवून प्रतिकारक्षम केले गेले पाहिजे. कराटे हे केवळ शिक्षणापुरते मर्यादित न राहता, वेळ आली तर त्याचा उपयोग स्वसंरक्षणासाठी कसा करावा, याचे ज्ञान आत्मसात केले पाहिजे.

तुझ्या पावलोपावली आज भयाचे काहूर माजले आहे. क्षणोक्षणी असे वाटते की, घरातून बाहेर गेलेली मुलगी सुखरूप घरी परत येईल ना? असे कोणते सुरक्षा कवच असावे जे तुझे रक्षण करेल..
आज समाजात घडणा-या अनेक घटना हृदय हेलावून सोडणा-या आहेत. आजच्या महिला दिनाला स्त्री असुरक्षित आहे.. हेच किती भयावह वाटते. तिच्या सुरक्षेची हमी कोणी देऊ शकते का? हा प्रश्नच खरं तर निरुत्तर करणारा आहे. त्यामुळे आज असंच म्हणावसं वाटतं.. कोणी नसेल तुझ्या रक्षणासाठी तर तूच कर तुझं रक्षण!

स्वत:मध्ये आत्मविश्वास जागा ठेव. खंबीर हो स्वत: आणि आत्मनिर्भर कर आजूबाजूच्या महिला-मुलींनाही.

खरंच आजची मुलगी भित्री, कमजोर बनू नये यासाठी तिच्या घरातूनच तिला बळ दिले जाणे गरजेचे आहे. लहान मुलींना गुड टच.. बॅड टच त्याचप्रमाणे समाजात घडणा-या घटनांची जाणीव करून दिली पाहिजे. तिचे संरक्षण तिने करण्यासाठीचे धडे तिला दिले गेले पाहिजेत. तिला सक्षम बनवलं गेलं पाहिजे. हे बाळकडू घरातूनच तिला मिळणे गरजेचे आहे.

आज काही संस्थांच्या माध्यमातून मुली- महिलांना स्वसंरक्षणासाठी प्रशिक्षण दिले जाते. स्वत:ला वाचविण्यासाठी वाईट गोष्टींचा प्रतिकार करण्यासाठी आजच्या मुलींना दुर्गा बनण्याची गरज आहे. तरच वाईट प्रवृत्तीला आळा बसू शकेल. स्वत:चे रक्षण करण्यासाठी काही धाडसी प्रशिक्षणे देखील लाभदायक ठरू शकतात. अगदीच नाही तर समोरच्या माणसाला सडेतोड बोलण्याचे, प्रतिकार करण्याचे धाडस. वाईट नजर.. वाईट स्पर्श.. घृणास्पद वागणूक मिळाल्यास..
उत्तर देण्याची क्षमता तिच्यात निर्माण होणे गरजेचे आहे.

कराटे : कराटेच्या माध्यमातून मुलीना स्वसंरक्षणासाठी प्रशिक्षण दिले जाते. यातून मुली निश्चितच स्वत:चे संरक्षण करू शकतात. अलीकडे शाळांच्या माध्यमातून अगदी पहिलीच्या वर्गापासून मुलींना कराटेचे प्रशिक्षण दिले जाते. त्यावर लक्ष केंद्रित करून त्याचे फायदे जाणून स्वरक्षणासाठी स्वत:ला सिद्ध केले पाहिजे. मुलींना सक्षम आणि खंबीर बनवून प्रतिकारक्षम केले गेले पाहिजे. कराटे हे केवळ शिक्षणापुरते मर्यादित न राहता, वेळ आली, तर त्याचा उपयोग स्वसंरक्षणासाठी कसा करावा, याचे ज्ञान आत्मसात केले पाहिजे.

शिक्षण : स्त्रीच्या जागृतीसाठी तिला संपूर्ण शिक्षण आवश्यक आहे. तिच्या सन्मानासाठी, करिअरसाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही. त्यामुळे मुलींना पूर्ण शिक्षण देणे हे पालकांनी जाणून घेऊन तिचा कमी वयात विवाह न करता, तिचे शिक्षण अर्धवट सोडून तिला घरी न बसवता समाजात तिचे स्थान तिला बळकट करू द्यावे.

स्वसंरक्षणाचे धडे : मुली- महिलांना सक्षम होण्यासाठी आज शिवकालीन युद्धकलाही नजरेचा थरकाप उडवणारी ठरू शकते. दांडपट्टा, तलवारबाजी, फरीगदगा अशा साहसी खेळातून मुलींना आत्मनिर्भर केले जाऊ शकते.


मुली,
समर्थ हो, सुसज्ज हो
नको डरू, नको हरू
धरून हात हाती हाता
पुरुषार्था वरू
सावित्रीची लेक गं
सोड आता भयशंका
जमिनीवर रोव पाय
ऐक आभाळी हाका
ऐक्य आपुले आता
शक्ती आहे जगताची
जयजयकार करू
वाट धरू नारी शक्तीची..
– विजया वाड, ज्येष्ठ साहित्यिका


आपल्या देशात आज महिलांच्या डोळ्यांसमोर राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंचा, महाराणी ताराराणींचा, राणी लक्ष्मीबाईंसह अनेक वीरांगणांचा आदर्श आहे. त्याचबरोबर त्यांचा लढाऊ बाणा अंगीकारणे गरजेचे आहे. ज्या शस्त्रविद्येने परकीयांपासून देश स्वतंत्र केला त्याच विद्येचा आज आपल्याला स्वसंरक्षणासाठी वापर करू शकतो. अशा स्वसंरक्षणासाठी प्रशिक्षण देणा-या अनेक संस्था महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहेत. त्या ठिकाणी याचे योग्य प्रशिक्षण घेऊन याचा नित्यनियमित सराव असेल, तर येणा-या काळामध्ये कोणत्याही संकटामध्ये धीरोदात्तपणे सामना करण्याची ताकद महिलांमध्ये निर्माण होईल. ही शिवकालीन युद्धकला नक्कीच उपयोगी ठरेल, अशी खात्री वाटते.
– प्रा. राजेश पाटील, अध्यक्ष, शिवकालीन मर्दानी युद्धकला महासंघ, कोल्हापूर.


हल्लीच्या तरुण मुलींनी स्वसंरक्षणाच्या जेवढय़ा पद्धती आहेत, त्यातील स्वत:ला जमेल ती पद्धत शिकून आत्मसात करणे गरजेचे आहे. आजच्या काळात, मुली, स्त्रियांनी पर्समध्ये डोळ्यात वा अंगावर आग ओकणारे डिओ ठेवावेत. ही आता काळाची गरज बनली आहे.
– चंद्रकला कदम


‘सध्या एकुलतं एक अशी कुटुंब पद्धती आहे. त्यामुळे इथे पालकांनी मुलांना संघटितपणे वावरणे शिकवले पाहिजे. यातून मुलांमधे, आत्मविश्वास, समयसूचकता, आत्मनिर्भरता हे गुण वाढीस लागतील. एकमेकांबद्दल प्रेम, जिव्हाळा आणि जबाबदारीची जाणीव तयार होईल. स्वभान ते समाजभान सतत राहील. भक्षण करणारी वृत्तीच कमी होईल आणि वेळ आलीच, तर रक्षण मग ते स्वत: च असो वा इतर कुणाचं बुद्धी आणि मन आपोआपच हात देईल.’
– माधुरी पाटील, स्वयंसिद्ध मैत्रीण


आजच्या मुलीने खरं तर नेहमीच सतर्क राहिले पाहिजे. स्वत: च्या रक्षणासाठी ज्युडो, कराटेचे शिक्षण घेतले पाहिजे. प्रसंगी हातापायी करण्याची तयारी हवी. तिच्या जवळ सतत स्वत: च्या रक्षणासाठी वस्तू असाव्यात. मुलींनी कधीच कोणत्याही अनोळखी माणसावर विश्वास ठेवता कामा नये. रात्री-अपरात्री निर्जन स्थळी कामाशिवाय जाऊ नये. प्रवास करताना आपण कसे आणि कुठे प्रवास करत आहोत याची माहिती घरातील माणसांना द्यावी.
– अ‍ॅड. निशा राजपूत


मुलींनी आज स्वत:ची काळजी स्वत: घेतली पाहिजे. आणि फिटनेसकडे देखील लक्ष दिले पाहिजे. सेल्फ डिफेन्स अ‍ॅक्टिव्हिटी शिकणे गरजेचे आहे. स्वत:च्या संरक्षणासाठी पर्समध्ये स्प्रे, चिली पावडर, नेहमीच सोबत ठेवली पाहिजे. तसेच मुलीनी मानसिक आणि शारीरिकरीत्या सक्षम असणे आवश्यक आहे. यासाठी योग्य ते प्रशिक्षण घ्यावे.
– सलमा शेख, जीम प्रशिक्षक


आजच्या मुलीने तिच्या रक्षणासाठी तायक्वांदो, कराटे प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. महिला कायदेविषयक ज्ञान मिळवणे आवश्यक आहे. जवळील पोलीस स्टेशन, फोन नंबर स्वत:जवळ ठेवणे आवश्यक. महिला सेफ्टी अ‍ॅप डाऊनलोड करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर सुरक्षेच्या दृष्टीने साहित्य जवळ असणे आवश्यक. (स्प्रे.. इत्यादी.) आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, महिला-मुलींमध्ये धाडसी वृत्ती असणे आजच्या काळात गरजेची आहे.
– ज्ञानदा तारकर, सिंधुदुर्ग

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here