सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून नवे अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. विविध विषय आणि विद्याशाखांमधील आंतरसंबंध समजून घेऊन, प्रत्यक्षातील प्रश्नांची समग्र उत्तरे शोधण्यावर भर देणारे बीए (लिबरल आर्ट्स), बीएससी ब्लेंडेड आणि मास्टर ऑफ डिझाईन हे तीन नवे अभ्यासक्रम यंदापासून सुरू झाले आहेत. विद्यापीठ आवारातील आंतरविद्याशाखीय प्रशाला (विज्ञान) अर्थात, ‘आयडीएसएस’ या विभागात हे तीन अभ्यासक्रम चालविले जातील. राज्यात पहिल्यांदाच एखाद्या सार्वजनिक विद्यापीठातर्फे हे अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात आले असल्याचा दावा विद्यापीठ प्रशासनाने केला आहे.

बीए : लिबरल आर्ट्स
हा अभ्यासक्रम तीन वर्षाचा असून, कोणत्याही शाखेतून बारावी उत्तीर्ण विद्यार्थी प्रवेशपरीक्षेसाठी पात्र आहेत. विज्ञान, कला, मानव्यविद्या अशा विविध विद्याशाखांमधील अनेक विषयांची एकमेकांशी सांगड घालणारा; तसेच गरज व आवडीनुसार विषय निवडण्याचे स्वातंत्र्य देणारा ‘लिबरल आर्ट्स’ हा अभ्यासक्रम जगभरात वेगाने लोकप्रिय होत आहे. एखाद्या प्रश्नाकडे सर्वागीण दृष्टिकोनातून बघण्याच्या शिकवणीमुळे लिबरल आर्ट्स शिक्षणाची पार्श्वभूमी असलेल्या विद्यार्थ्यांना अनेक उद्योगांत विशेषत: डिजिटल क्षेत्रातील उद्योगांत प्राधान्य मिळत आहे.

बीएस्सी ब्लेंडेड
विज्ञानातील विविध विषयांचा समन्वय साधणे हे सूत्र ‘बीएस्सी ब्लेंडेड’ या अभ्यासक्रमाची आखणी करण्यात आली आहे. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित (पीसीएम) हे विषय घेऊन बारावी उत्तीर्ण झालेला विद्यार्थी या अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेला बसू शकतो. तीन वर्षाच्या या अभ्यासक्रमात पहिली दोन वर्षे विद्यार्थी विज्ञानातील विविध मूलभूत विषय शिकतील. शेवटच्या वर्षात भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, पर्यावरणशास्त्र आणि भू-विज्ञान (अर्थ सायन्सेस) या चारपैकी एका विषयाचा पदवी पातळीवर सखोल अभ्यास (स्पेशलायझेशन) करता येईल. विद्यापीठाच्या या ब्लेंडेड अभ्यासक्रमाला ऑस्ट्रेलियातील मेलबर्न विद्यापीठाचे सहकार्य मिळाले आहे. या पदवीची गुणवत्ता मेलबर्न विद्यापीठ आश्वासित करणार असल्यामुळे ही पदवी जगभर त्या विद्यापीठाच्या पदवीशी समकक्ष मानली जाणार आहे.

मास्टर ऑफ डिझाईन
‘मास्टर ऑफ डिझाईन’ हा पदव्युत्तर अभ्यासक्रम दोन वर्षाचा आहे. बीई/बीटेक किंवा पाच वर्षाचा बी आर्क किंवा चार वर्षाची बी. डिझाईन ही पदवी उत्तीर्ण झालेला विद्यार्थी या अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेला बसू शकतो. वस्तू, सेवा, संस्था आणि व्यवस्थांची सुयोग्य रचना निर्माण करणे ही एक बहुआयामी आणि आव्हानात्मक प्रक्रिया असते. एखादी रचना तयार करताना तिच्या वापरण्यातील सुलभता, कार्यक्षमता, वापरणा-यांची मानसिकता, संस्कृती, सौंदर्य, किफायतशीरपणा अशा अनेक गोष्टींचे संतुलन साधावे लागते. त्यात अभिनवता आणावी लागते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here