डॉ. शैलेश उमाटे

मनात विचारांची तीव्रता वाढत जाणे, नको नको ते विचार मनात येणे, विचारांत नैराश्यता येणे, कधी कधी अतिनैराश्यामुळे आत्महत्येचाही विचार मनात डोकावणे, असे विचार नको असले तरी तीव्रतेने जाणवणे, ही सारी ओसीडीच्याच आजाराची लक्षणे.

४४ वर्षाची रिमा ही नियमितपणे देवाची पूजा करणारी गृहिणी आहे. ती कुटुंबीयांसोबत ब-याच तीर्थक्षेत्रांना गेलेली होती. तिचे दररोजचे जीवनमान सुरळीत चालू होते. सकाळी देवाची प्रार्थना करणे, पूजा व बत्ती करणे हे तिचे नित्याचे दैनंदिन होते. गेल्या वर्षभरात यात बरेच बदल झालेले होते. अगदी ती आता काहीच पूजा करीत नाही. कोणत्याही मंदिरात जात नाही. एवढंच काय तर देवांचे फोटो बघण्याचेदेखील टाळत राहते. तिच्या अशा बदललेल्या वागण्यावर सर्वच आश्चर्यचकित झाले आहेत. कुणालाही काहीच कळत नव्हते. तिची खूप चिडचिड वाढली होती. तिचे मुलांकडे लक्ष नव्हते. हे सर्व होत असताना तिला कुणाला काय सांगावे? तिचा त्रास कसा व्यक्त करावा, हेही कळत नव्हते.

एक ते दीड वर्षापासून रिमाच्या मनात घाणेरडे विचार येत होते. सुरुवातीला देवांची पूजा करताना तिला ते विचार सतावत होते. त्या विचारात देवाला ती काही घाण लावत आहे किंवा देवांचे लिंगाचे चित्र तिच्या डोळय़ांसमोर यायचे. हे विचार किंवा ते चित्र मनातून काढण्यासाठी परत ती देवाची प्रार्थना करीत असे. कितीही प्रार्थना केल्या तरीही तिच्या मनातील हे पाप अक्षम्य आहे, असेच तिला वाटत राहायचे. या विचारांची तीव्रता वाढतच होती. दररोजच्या पूजेत तिचा बराच वेळ जात असे. पूजेला वेळ लागला तरी मनात समाधान नव्हते. म्हणून तिने ती पूजा बंद केली. मंदिरात गेल्यावर किंवा देवांचे फोटो बघितल्यावर तिला परत तसेच विचार येत असत. हळूहळू मंदिरात जाणे बंद केले. घरातील सर्वच देवांचे फोटो उलट करून ठेवले. यामुळे तिच्या त्रासाची वारंवारता कमी झाली होती. पण, ते विचार समूळ गेले नव्हते. कधी कधी देवाबद्दलचे हे निंदनीय विचार किंवा चित्रे तिच्या मनात येतच होती.

अशाच विचारांचा त्रास २० वर्षाच्या रितिकालाही होत होता. तिला सतत भीती वाटत होती की, ती सर्वासमोर वेडय़ासारखी तर वागणार नाही ना? ती काही चुकीचे तर बोलणार नाही ना? त्यामुळे ती तिच्या मैत्रिणींना सतत विचारत असे की, ती व्यवस्थित आहे ना? ती व्यवस्थित बोलते ना? काही चूक नाही करत ना? तिच्या मनात कुठेतरी वाटायचे की, ती बरोबर आहे, पण मनाची खात्री पटतच नसायची म्हणून ती मैत्रिणींना विचारत असे. तिचे हे वागणे चुकीचे आहे, असे तिला वाटायचे, पण ते तिला त्यापासून परावृत्त होता येत नव्हते.

अशा प्रकारचे वेगवेगळे विचार किंवा डोळ्यांसमोर प्रतिमा दिसणे किंवा देवाबद्दल निंदनीय विचार येणे, हा एक प्रकारचा ओसीडीचा आजार आहे. सहसा, श्रद्धाळू, देवभक्त व मनाने निष्पाप असणा-या व्यक्तींना असा आजार होतो. त्यांनी देवाविरुद्ध खूप मोठे पापकृत्य केले आहे असे त्यांना वाटते. ब-याच वेळेस ही लोकं पुजारी, पाद्री यांना त्यांच्या चुकांबद्दल बोलतात. त्यातूनही त्यांना आराम मिळत नाही. हे विचार त्यांचा सतत पाठलाग करीत राहतात. यांना या विचारांमुळे नैराश्यतेची लक्षणे अधिक प्रमाणात असतात. कधी कधी ते अतिनैराश्यतेमुळे आत्महत्येचाही विचार करू शकतात.

तसेच काही लोकांना सर्व गोष्टी अगदी प्रमाणबद्ध, नीटनेटके, अगदी समत्वात ठेवावे वाटते. घरातील, ऑफिसातील वस्तू नीटनेटके नसतील, तर त्या वस्तू नीटनेटके व व्यवस्थित ठेवण्यात त्यांचा सर्व वेळ घालवतात. त्यात त्यांचा फारच वेळ जातो. तशाच वस्तू नसतील, तर ते फारच चिडचिडे होतात.

६३ वर्षाचे राम काका हे अशाच गोष्टींचा त्रागा घेऊन आले होते. ते अगदी नीटनेटके. त्यांनी तशीच सवय दोन्ही मुलींना लावण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांच्याप्रमाणेच सर्व वस्तू नीटनेटक्या करण्यात सर्व कुटुंबाला जड जात होते. मुली आता २०-२२ वर्षाच्या झाल्या होत्या. त्या मुलींची वडिलांबरोबर बरीच वादावादी व्हायची. घरातील वातावरण अगदी तणावपूर्ण होतं. राम काकांना काय करावे कळत नव्हते. नाइलाजाने का होईना ते मदत घ्यायला आले होते. मोजक्याच औषधांनी व समुपदेशनाने त्यांच्यात बराच फरक आला होता.

ओसीडीचा आजार हा वेगवेगळ्या स्वरूपात येतो. जनसामान्यांना ते आजार आहे, असे वाटतच नाही. म्हणून त्याचा इलाज लांबणीवर जातो. वरील उदाहरणातून आपणास वेगवेगळे प्रकार कळले आहेतच, पण याची अजून बरीच लक्षणे किंवा विचार असतात. मुख्यत: कोणतेही विचार किंवा चित्र सतत मनात येणे, त्याला मनातून काढण्यासाठी दुसरे विचार करणे. हे विचार अगदी नको असणे, पण तरीही ते मनात अतितीव्रतेने येणे. अशा विचारांत ओसीडीचा आजार असतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here