प्रफुल्ल फडके

आजपर्यंत दिल्लीश्वरांपुढे कधी झुकायचे नाही हा मराठी बाणा होता. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवराय यांनीही औरंगजेबाला दिल्लीच्या दरबारात न झुकता आपला ताठ बाणा दाखवला होता. पण याच छत्रपती शिवरायांचे नाव घेऊन राजकारण करणा-या शिवसेनेने दिल्लीच्या तख्तापुढे झुकताना आपली लाचारी दाखवून दिली. हा महाराष्ट्राचा अपमानच नाही, तर शिवसेनेकडून महाराष्ट्राची झालेली घोर फसवणूक आहे. अशी लाचारी पत्करण्याची नामुष्की का आली, या प्रश्नाचे उत्तर महाराष्ट्रातील जनता शिवसेनेकडे मागत आहे.

शिवसेना आमच्या बरोबर आली तर त्यांचे उमेदवार जिंकून आणू, नाही आली तर त्यांना पटकवू असे उद्गार भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी ५ जानेवारीला काढले होते. शिवसेनेला वारंवार विनंत्या करूनही आम्हीच जास्त शहाणे आहोत, असे भासवण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे यांनी सुरू ठेवला, पण आपल्या मर्यादा लक्षात आल्यावर आणि भाजप आपल्याला पटकवल्याशिवाय राहणार नाही याची जाणीव झाल्यावर उद्धव ठाकरे यांनी नमते घेतले आणि चक्क अमित शाह यांच्यासमोर अक्षरश: नाक घासत शरणागती पत्करली. स्वबळाची भाषा गळून पडली आणि आता भाजपच्या तालावर नाचण्यासाठी अमित शाहांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शिवसेनेला गांधीनगरला लाचारपणे जावे लागले. शिवसेनेला इतके लाचार व्हावे लागणे हा महाराष्ट्राचा आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचाच पराभव उद्धव ठाकरे यांनी कृतीतून केला आहे.

लाचारपणे गांधीनगरच्या सभेत उद्धव ठाकरे म्हणतात की, आमच्यामध्ये मतभेद नक्की होत, मात्र आता शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष मनाने एक झाले आहेत. दोन्ही पक्षांच्या विचारधारा एकच असल्याने आम्ही एकत्र आलो आहोत, असे म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गांधीनगरचे भाजपचे उमेदवार अमित शाह यांना शुभेच्छा दिला. भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी शनिवारी गांधीनगर मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज भरला त्यावेळी उद्धव ठाकरे यांना त्या ठिकाणी जाणे भाग पडले. बाळासाहेबांचा आशीर्वाद घेऊनच मी अमित शहांना शुभेच्छा देण्यासाठी इथे आलो आहे, असे यावेळी उद्धव ठाकरे यांनी केलेले वक्तव्य अत्यंत हास्यास्पद असेच होते.

पूर्वीच्या काळी बलाढय़ राजे छोटय़ा राजांना मांडलिक करून घ्यायचे. तसे मांडलिकत्व शिवसेनेने भाजपचे पत्करलेले आहे. ही युती नाही, तर पराभवाच्या भीतीने आणि अस्तित्वाच्या लढाईसाठी सेनेनी केलेली तडजोड आहे. नाहीतर भाजपने वेळोवेळी शिवसेनेची जागा दाखविल्यावर व भाजपकडून इतका सणकून मार खाल्ल्यावर पुन्हा त्यांचेच जोडे उचलायला जाण्याची वेळ का आली असती? ही सगळी शिवसेनेच्या कर्माची फळे आहेत. गेली चार-साडेचार वर्षे भाजपवर सतत टीका केली. आम्ही खिशात राजीनामे घेऊन हिंडतो, असे सांगून गाजावाजा केला. आम्ही भाजपबरोबर नाही असे सांगत सतत स्वबळाची भाषा केली. शिवसेनेची सगळी धोरणे ठरवण्याचा मक्ता मिळाल्याप्रमाणे खासदार संजय राऊत तर एका बाजूने सतत अमित शाह, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर शेलक्या शब्दांत टीका करत होते. कोणत्याही परिस्थितीत आम्ही युती करणार नाही. भाजपला सत्तेपासून रोखूपासून पंतप्रधान नरेंद्र मोदींना ‘चौकीदार चोर है’पर्यंत सर्व काही शिवसेनेकडून बोलून झाले होते. उद्धव ठाकरे यांनीही जाहीरपणे राहुल गांधींची स्क्रिप्ट वाचून दाखवल्याप्रमाणे ‘चौकीदार चोर है’ अशी नरेंद्र मोदींवर टीका केली होती. कोणत्याही परिस्थितीत आम्ही युती करणार नाही, तर स्वबळावरच लढणार असा आव आणला. मग कुठे गेले हे आवसान?

हा महाराष्ट्राचा बाणा नाही. म्हणजे एकीकडे कंठशोष करून शिवसेनेचे नेते, उद्धव ठाकरे आम्ही युती करणार नाही, असे सांगत असताना भाजप नेते मात्र शांत होते. आमची युती होणारच. शिवसेना आमच्यासोबत असेलच. आम्हाला सोडून ती जाणार नाही हे सातत्याने सांगत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आपल्या वेगवेगळ्या बैठकात आत्मविश्वासाने युती होणारच म्हणून सांगत होते. या सगळ्या शक्यता फेटाळून लावत संजय राऊत, उद्धव ठाकरे हे आम्ही स्वबळावर लढणार असा सूर लावत होते. मग अचानक असे काय झाले की शिवसेनेला नमते घ्यावे लागले?

भाजप नेत्यांचा, पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाध्यक्ष अमित शाह यांचा वाटेल तसा अपमान करून, त्यांच्यावर अर्वाच्च भाषेत टीका करून आता त्यांचेच पाय चाटायला शिवसेना जात असेल, तर हा मराठी बाणा नाही, याला चक्क लाचारी म्हणतात, असेच म्हणावे लागेल. कालपर्यंत भाजप म्हणजे अफझल खानाची फौज होती, असे उल्लेख शिवसेना करत होती. अफझल खानाची फौज म्हणून भाजपला हिणवणा-या शिवसेनेची भाजपने पुरती जिरवली आहे हेच यातून दिसून येते. म्हणजे या स्वयंघोषित ढाण्या वाघाची नखे आणि दात काढून घेतले आणि भाजपने आम्ही अफझल खान नाही, तर तुम्हीच शाहिस्ते खान आहात. तुमची आम्ही बोटे छाटली आहेत हे दाखवून दिले. सर्कशीतल्या वाघाप्रमाणे किंवा प्राणीसंग्रहातील शक्तीहीन वाघाप्रमाणे प्रेक्षकांना दाखवायला या वाघाचा वापर आता अमित शाहांनी केला आहे. या वाघाच्या गळ्यात पट्टा बांधून साखळीला धरून अमित शाह आता त्यांना दोरीवरून चाला, शिडीवर चढा, स्टुलावर बसा अशी सर्कस करून घेत आहेत. या सर्कशीतल्या खेळाचाच एक भाग म्हणजे शनिवारी अमित शाहांच्या उमेदवारी अर्जाच्या रॅलीला उद्धव ठाकरे यांना उपस्थित राहणे भाग पडले. आपल्या महाराष्ट्रातील उमेदवारांच्या उमेदवारी अर्जासाठी त्यांना वेळ नाही आणि गुजरातमध्ये जाऊन लाचारीचे प्रदर्शन करण्यासाठी शिवसेनेच्या पक्षप्रमुखाला वेळ मिळतो. याला अमित शाहांनी पटकवले असेच म्हणावे लागेल ना?

‘आलात तर तुमचे उमेदवार निवडून आणू, नाही तर पटकवू’ हा अमित शाह यांनी दिलेला इशारा त्यावेळी चांगलाच झोंबला होता. उद्धव ठाकरे आणि शिवसेनेच्या नेत्यांना हा इशाराच इतका सणसणीत होता की उद्धव ठाकरे यांना लोटांगण घालण्याशिवाय पर्याय राहिला नाही. जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवडय़ापर्यंत अत्यंत खालच्या पातळीवर टीका करून शिवसेनेने भाजपवर चिखलफेक केली होती. सतत स्वबळाची भाषा करून आपले महत्त्व वाढवायचा प्रयत्न केला. आमच्याशिवाय तुमचे काही चालणार नाही, हे बिंबवण्याचा प्रयत्न केला. पण हे सगळे प्रयत्न वांझोटे राहिले. ‘सौ सुनार की एक लुहार की’ अशी आपल्याकडे म्हण आहे. त्याप्रमाणे अमित शाहांनी एकच टोला हाणला, पटकावण्याची भाषा केली आणि या ढाण्या वाघाची बत्तीशी घशात गेली. भाजप आपल्याबरोबर नसेल तर आपले काही खरे नाही हे त्यांना कळून चुकले. त्यामुळे नाईलाजाने भाजपचे मांडलिकत्व पत्करून ते सांगतील तिथे उद्धव ठाकरे यांना जाणे भाग पडत आहे.

शनिवारी अर्ज भरण्याच्या सभेत उद्धव ठाकरे म्हणाले की, गांधीनगरच्या या सभेत सर्वजण ‘मोदी, मोदी’ अशा घोषणा देत आहेत. मी विरोधकांना आवाहन करतो की, त्यांचा नेता कोण आहे, हे त्यांनी सांगावे. दिल मिले ना मिले, हात मिलाओ असे म्हणतात. यांचे हात मिळालेले आहेत, मने मात्र मिळालेली नाहीत अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर तोफ डागली. आमची मात्र मने जुळलेली आहेत. हिंदुत्व हा आमचा श्वास आहे आणि तो थांबला तर जगायचे केस? या वक्तव्याद्वारे उद्धव यांनी मोदींचे नेतृत्व मान्य तर केलेच, पण चार वर्षे जेवढी टीका केली त्याचे उट्टे गोड बोलून काढण्याचे काम अमित शाह यांनी केलेले दिसते. आजपर्यंत दिल्लीश्वरांपुढे कधी झुकायचे नाही हा मराठी बाणा होता. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवराय यांनीही औरंगजेबाला दिल्लीच्या दरबारात न झुकता आपला ताठ बाणा दाखवला होता. पण याच छत्रपती शिवरायांचे नाव घेऊन राजकारण करणा-या शिवसेनेने आपली लाचारी दाखवून कणाहीन असल्याचे दाखवले. हा महाराष्ट्राचा अपमानच नाही, तर शिवसेनेकडून महाराष्ट्राची झालेली फसवणूक आहे. त्यामुळे निवडणुकीत पटकवणारे अमित शाह यांनी निवडणुकीपूर्वीच पटकावून टाकले आहे. आता त्यांच्या बोटावर नाचण्याशिवाय सेनेला पर्याय राहिलेला नाही. हा शिवसेनाप्रमुखांच्या विचारांचा पराभव आहे. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या या कृतीने सच्चा शिवसैनिक त्यांच्यापासून लांब गेल्याशिवाय राहणार नाही हेच दिसते आहे.

लातूर, हिंगोली येथे झालेल्या भाजपच्या मेळाव्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला चांगलाच इशारा दिला होता. त्यानंतर पुण्यातील मेळाव्यातही शिवसेनेला इशारा दिला होता. शिवसेनेला त्यांनी अल्टिमेटम दिला होता. तेव्हा स्पष्ट केले होते की, शिवसेना भाजपबरोबर असेल तरच निवडून येऊ शकते. ती बरोबर आली तर त्यांचे उमेदवार निवडून आणा नाहीतर चांगलेच पटकावून काढा. हा पटकावून काढा सेनेला झोंबला होता. खासदार संजय राऊत यांनीही शिवसेनेला अल्टिमेटम कोणी देऊ शकत नाही असे वक्तव्य केले होते. असे असताना आता शिवसेनेची युती झालीच कशी? शिवसेनेनी ही युती का केली? अशी लाचारी पत्करण्याची नामुष्की त्यांच्यावर का आली? या प्रश्नांची शिवसेनेला उत्तरे द्यावी लागतील. पण ज्याप्रकारे शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांना व्यासपीठावर बोलावे लागत आहे, यातून शिवसेनेचा सगळा दम निघून गेल्याचे दिसून येते आहे. कोल्हापुरातील सभेत त्यांचे असलेले संदर्भहीन भाषण, शनिवारचे गांधीनगरमधील भाषण भाजपने पटकवल्याचे लक्षण आहे. शनिवारी मला इथे बघून सर्वाना आश्चर्य वाटले असेल, असे म्हणणे म्हणजे स्वत:च्या मनातील ती खंत त्यांनी व्यक्त केलेली आहे. यातून शिवसेना-भाजप ही युती नाही तर भाजपच्या दारात त्यांना बांधून ठेवले आहे आणि पाहिजे तेव्हा त्यांना आवाज काढायला लावणार नाहीतर तोंड बंद ठेवण्याचा प्रकार भाजपकडून झाला आहे हे लक्षात घेतले पाहिजे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here