दिलीप चव्हाण

ज्या गृहनिर्माण सोसायटीत आपण राहतो, ती सोसायटी स्वच्छ, टाप-टीप ठेवून ती एक आदर्श सोसायटी म्हणून विभागात नावारूपाला येईल असे प्रत्येक सभासदाने वागल्यास ते त्यांची सोसायटीप्रति जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडत आहेत, याची प्रचिती येते. केवळ आपले घर स्वच्छ ठेवणे म्हणजे सोसायटी स्वच्छ ठेवणे असे नाही. कोणाही सभासदास त्याच्या गाळय़ामध्ये कार्यकारी समितीच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणत्याही प्रकारचे जादा बांधकाम वा फेरफार करता येत नाहीत.

आपल्या गृहनिर्माण संस्थेची सर्वागीणदृष्टय़ा स्वच्छ, टाप-टीप ठेवणे हे सर्व सभासदांचे कर्तव्य असते. केवळ ज्या गाळ्यात-सदनिकेत आपण राहतो ती स्वच्छ ठेवणे, तिची निगा राखणे हे जसे आपण आपले कर्तव्य समजतो त्याप्रमाणे आपल्या सदनिकेबाहेरील म्हणजेच संपूर्ण संस्थेची निगा राखणे ही प्रत्येकाची जबाबदारी असते; आणि अशा जाणिवेने प्रत्येक सभासदाने वागल्यास आपण केवळ सोसायटीत राहत नाही तर तिची निगासुद्धा राखतो याचे समाधान मिळते.

प्रत्येक सदनिकाधारकाने आपण राहत असलेला गाळा-सदनिका स्वच्छ ठेवला पाहिजे. गाळ्यात काहीएक सुधारणा करायची असेल, जादा बांधकाम करायचे असेल तर सोसायटीच्या कार्यकारी समितीची लेखी परवानगी घेणे कायद्याने बंधनकारक आहे. याचाच अर्थ असा की, कार्यकारी समिती सोसायटीची दक्षता घेते व सोसायटीला काही धोका-बाधा येणार नाही ना याचा विचार करते. संरचनात्मक बदल, संबंधित सक्षम प्राधिकरणाच्या पूर्व परवानगीशिवाय करता येत नाही.
ज्यावेळी सभासदाचा गाळ्यात /सदनिकेत फेरफार करणे विषयी संस्थेकडे लेखी अर्ज येतो त्यावेळी सचिवाने समिती सदस्यांना घेऊन अर्जदाराच्या गाळ्यात जाऊन पाहणी करून योग्य तो सल्ला अर्जदाराला देता येतो. अर्जदार जरी स्वखर्चाने करीत असला तरीसुद्धा सहकार कायद्यात बसतो की नाही याची खातरजमा सचिवाने करणे योग्य ठरते. कोणत्या दुरुस्त्या संस्था करू शकते आणि कोणत्या दुरुस्त्या सभासद स्वखर्चाने करू शकतो याची तपशीलवार माहिती सचिव अर्जदाराला देईल, म्हणजे गैरसमज होणार नाहीत. एखादा प्रश्न गहन असल्यास संस्था वास्तुशास्त्रज्ञांचा सल्ला घेऊ शकते.

गाळा, सदनिका जरी आपली स्वत:ची असली तरी तिचा योग्य वापर करणे हे गाळाधारकाचे कर्तव्य असते. बेकायदेशीरपणे वापर करणे हे कायद्याने बंधनकारक आहे; कारण ते संपूर्ण सोसायटीला धोकादायक आणि त्रासदायक ठरू शकते.

कोणताही माल किंवा पदार्थ ज्वालाग्राही-स्फोटक असेल तो सदनिकेत-गाळ्यात साठवून ठेवू शकत नाही. असा माल किंवा पदार्थ साठविण्यासाठी कायद्याने सक्षम अधिका-याची लेखी परवानगी आवश्यक असते. विनापरवाना-परवानगीविना बंदूक सुद्धा जवळ बाळगणे हा गुन्हा ठरतो.

इतकेच नव्हे तर आपल्या गाळ्यात कोणाही सभासदाने इतर सभासदांस गैरसोयीचे, उपद्रवकारक वा त्रासदायक होईल असे कृत्य स्वत: करू नये अगर घडू देऊ नये अथवा इतर सभासदांच्या सर्वसाधारण सभ्यतेस वा नैतिक मूल्यांस बाधा निर्माण होईल असे गैरप्रकार करणे म्हणजे गुन्हा ठरतो. असे प्रकार जरी आपल्याकडून घडले नाहीत आणि इतरांकडून घडत असतील तर तशी तक्रार आपण एक जबाबदार नागरिक म्हणून करू शकतो. कोणाकडून तशी तक्रार जरी आली तरी अशा गैरप्रकारास पायबंद घालण्याची कारवाई करणे कायदेशीर ठरेल. अशा प्रकारच्या जबाबदा-या सभासदांच्या असतात. याविषयी सविस्तर माहिती निबंधक किंवा वकील देऊ शकतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here