मधुकर भावे, ज्येष्ठ पत्रकार 

मोबाईल. ९८६९२३९९७७, ९८९२०३३४५८­­­­­­­­­­­­­­­­­­­­

या लोकसभा निवडणुकीत कोकणामधील दोन्ही जागा आणि ठाण्याची जागा भाजपा-सेना युतीच्या हातून हिसकावली जाईल अशी चिन्हे आहेत. आज आठवण झाली नारायण राणे कॉंग्रेसमध्ये येऊन विधानसभेच्या पोटनिवडणुकीला उभे राहीले त्या निवडणुकीची. त्या निवडणुकीत खुद्द बाळासाहेब ठाकरे कणकवलीत पोहोचले होते, त्यांच्या दोन सभा झाल्या होत्या. त्यांनी आवाहन केलं होतं.. ‘नारायण राणेंना पाडा’… बाळासाहेबांचा शब्द खाली पडला. मतदारांनी नारायण राणे यांना निवडून दिले एवढेच नव्हे तर, कॉंग्रेसचे चार आमदार नंतर निवडुन आले… इतिहासाची पुनरावृत्ती कोकणात होत आहे. आता दुर्दैवाने बाळासाहेब नाहीत. उध्दव ठाकरे शिवसेनाप्रमुख आहेत. ‘खड्यात गेली युती’ अस जाहिरपणे सांगणारया उध्दव ठाकरे यांना फडणवीसांनी सज्जड दम दिल्यावर ठाकरे घाबरले, यातून युती झाली. पण, मन फाटलेलीच आहेत. शिवाय ठाकरेंचे जे उमेदवार आहेत, जे २०१४ साली निवडून आले होते त्यांना लोकसभेत तोंड उघडता आलेलं नाही. बाळासाहेब कोकणात आले होते. त्यांनी नारायण राणे यांना पराभूत करायला सांगितलं. मतदारांनी राणे यांना विजयी केलं. आता उध्दव ठाकरे कोकणात जावून लोकसभेत तोंड न उघडलेल्या विनायक राऊत यांना आणि दुसरे हाताची घडी तोंडावर बोट वाले अनंत गीते निवडून द्या सांगणार आणि मतदार या दोन्ही उमेदवारांना आपटणार.

आजच वातावरण असं आहे की, सिंधुदूर्गातली जागा निलेश राणे मोठया मतानी जिंकतील. शिवसेनेचे सैनिक विनायक राऊतांवर नाराज आहेत. भाजपाचे कार्यकर्ते दोन्ही मतदारसंघात राऊत-गीतेंचं काम करायला तयार नाहीत. खुद्द नारायण राणे सिंधुदुर्गात ठाण मांडून बसलेत. त्यांचा संघटनात्मक आवाका फार मोठा आहे. शिवाय नितेश राणे ‘निलुदादा’साठी जी मेहनत घेत आहेत, त्याला तोड नाही. माझ तर राजकीय निरीक्षण असं आहे की, विधानसभा निवडणुकीत कणकवली मतदारसंघात नितेश राणे कॉंग्रेसकडून उभे राहीले तरी निवडून येतील, स्वाभिमानकडून राहीले तरी येतील, त्यांनी मतदारसंघात आपल नेतृत्व तयार केलं आहे, लोकांनी ते स्वीकारलंय. सिंधुदुर्गात कॉंग्रेसने जो उमेदवार दिला. त्याबद्दल काय बोलावं?
खरंतर ही जागा निलेश राणे यांना सोडायला हवी होती. पण, प्रदेश कॉंग्रेसच्या अध्यक्षांनी सगळा घोळ घालून ठेवला. सांगलीची जागा त्यांनी सोडून दिली. सांगली म्हणजे वसंतदादांची सांगली. ती जागा सोडली, कोणाला सोडली? राजू शेट्टींना सोडली. राजू शेट्टीनी पत्रकार परिषद घेऊन सांगून टाकलं, ही जागा आम्ही मागितलीच नव्हती. मग प्रदेश अध्यक्षांनी ही जागा का सोडली? सांगलीचे माजी खासदार वसंतदादांचे नातू प्रतिक पाटील यांनी अतिशय मुद्देसूद आणि तळमळींने निवेदन केलं, आज दादा जिवंत असते तर, सांगलीची जागा सोडणाºया अध्यक्षांवर त्यांनी काठीच उगारली असती. अध्यक्षांच म्हणणं असे की, सांगलीची जागा कॉंग्रेस जिंकणार नाही, मग, अध्यक्षांनी कॉंग्रेसच्या ज्या जागा महाराष्ट्रात उभ्या केल्या आहेत त्या सगळ्या जागा कॉंग्रेस जिंकणार आहे का? सहा महिन्यापूर्वी पालघरच्या पोटनिवडणुकीत कॉंग्रेसने कारण नसताना हात दाखवून अवलक्षण केलं. दामू शिंगडाला उभं केलं, १७ लाख मतांमध्ये कॉंग्रेसला मत मिळाली फक्त ४० हजार. कॉंग्रेस त्या मतदारसंघात उघडी पडली. त्यावेळी याच जागेवर सातत्याने लिहीत होतो… ‘ही जागा हितेंद्र ठाकूर यांच्या उमेदवाराला सोडा..’ तेव्हा ऐकलं नाही कॉंगे्रसची फजिती झाली. आता या निवडणुकीत ती जागा कॉंग्रेसने हितेंद्र ठाकूरना सोडली, उशीरा शहाणपण आलं. पण सांगलीची जागा सोडायच काहीच कारण नव्हतं. तिकडे उध्दव ठाकरे यांनी ज्या वनगाला उमेदवारी देऊन ‘हा आमचा वणवा आहे’ असं म्हटलं होतं. त्याला पुन्हा फसवलं. मुख्यमंत्र्याच्या धाकाखाली आता गावित शिवसेनेचा उमेदवार होणार. राजकारणाच गटार करायला फडणवीस आणि ठाकरे एकाचवेळी घमेली घेऊन घाण ओतत आहेत. त्यांना काय करायचं ते करु द्या. पण, कॉंग्रेसनं ऐन मोक्याच्यावेळी जे काही डावपेज खेळले. त्याबद्दल पक्षश्रेष्ठींनी अध्यक्षांना क्षमा करु नये. मुंबई कॉंग्रेसचा अध्यक्ष संजय निरुपमला दूर करताना निवडणुक लढवायचं कारण दिलं. प्रदेशअध्यक्षही मनाविरुध्द निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या मनात त्यांच्या सौ.ना तिकिट द्यायचं होतं. राहुल गांधी यांनी ते नाकारलं. तेव्हापासून अशोक चव्हाण यांच सगळं राजकीय नाटक बिथरलय. औरंगाबादमध्ये जे अब्दुल सत्तार अपक्ष उभे राहीले ते अशोक चव्हाण यांच्या सांगण्याशिवाय राहूच शकत नाहीत. राहुल गांधी यांनी हा सगळा विचार करावा. देशात कॉंग्रेसला उत्तम वातावरण आहे. महाराष्ट्र सर्वात आघाडीवर रहायला हवा होता. पण, दोन्ही पद मांडीखाली दाबून बसलेल्या अशोक चव्हाण आणि विखेपाटील या दोघांनी वातावरण नासवलं. पक्षाची पद भोगून पक्षाची बदनामी यांनीच केली.

निलेश राणे यांच्यापुढे राऊत फारच कमजोर
तटकरे गीतेंपेक्षा ‘अनंत’पटीने भारी
परांजपे ठाण्याच्या मतदारांना ‘विचार’ करायला लावणार…

आज राहून राहून असे वाटते की, प्रदेश कॉंगे्रेसच्या अध्यक्षपदी त्याचवेळी नारायण राणे यांना आणलं असतं तर, महाराष्ट्रावर आजची ही वेळ आलीच नसती. पुरोगामी महाराष्ट्र आज पुन्हा घसरणीला लागला. तरीसुध्दा शहा-फडणवीस-ठाकरे टोळीला यश मिळताना टाके ढिले होणार आहेत. कोकणातली सेनेच्या दोन्ही जागा गेल्याच म्हणून समजा.

निलेश राणे मोठया मताने ही जागा काढणार आणि तिकडे रायगड मतदारसंघात सुनील तटकरे गेल्या पराभवाचा वचपा काढणार. काय ते अनंत गीते मंत्री असून त्यांनी केलं काय? तटकरे आणि गीते ही दोन नाव समोर आली तर, कोणीच एका क्षणात सांगू शकेल की, गीतेंना तटकरे ह्यअनंतह्ण पटीने भारी आहेत. कामात भारी आहेत, संघटनेत भारी आहेत, मंत्री म्हणून भारी आहेत आणि व्यक्तिमत्वात भारी आहेत. निलेश राणेही तसेच आहेत. एवढा सुशिक्षित उमेदवार कोकणाला मिळाला याचीच चर्चा आहे. मागच्या निवडणुकीतला बदला सिंधुदूर्गचा मतदार नक्की घेणार. शिवाय निवडून आल्याने कॉंग्रेसच नुकसान काय? आज भाजपा हा देशाचा मुख्य शत्रू असेल तर, भाजपा-सेनेच्या कोणत्याही उमेदवाराला हरवणारा विजयी उमेदवार कोणत्याही पक्षाचा असो…. त्याचा पुरस्कारच केला पाहिजे. मोदींच राज्य दिल्लीत घालवणार हीच खरी लोकशाही वाचविण्याची एकमेव कसोटी आहे. नोव्हेंबरात विधानसभेच्या निवडणुका होतील तेव्हा राजकीयदृष्ट्या भ्रष्टाचार करणाºया फडणवीस आणि टोळीला कसं उघड पाडायचं हे फार कठीण नाही. पण, आधी दिल्लीच्या मुळावर घाव घालू या. मग महाराष्ट्र शेवटचा मुद्दा. विषय कोकणातला आहे म्हणून सांगतो… ठाण्यात राजन विचारे यांचेही काही खरे नाही. आनंद परांजपे घराघरात घुसलेत. मी कित्येक दिवस लिहीतोय.. सेना-भाजपाने कितीही मिठ्या मारल्या तरीही या निवडणुकीत ४०-४५ ची स्वप्न हवेत राहतील. लिहून ठेवा ४८ पैकी दोघांना मिळून २४-२५ जागा मिळाल्या खूप. आणि भाजपाच्या या पराभवात सिंधुदुर्ग-रत्नागिरी-ठाणे आघाडीवर राहतील. या निकालानंतर तरी महाराष्ट्र कॉंग्रेसला सुबुध्दी होवो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here