भाऊ तोरसेकर

सवाल तंत्रज्ञान सज्ज असण्याचा नसतो व नव्हता, राजकीय हिंमतीचा होता. मोदी सरकारने राजकीय हिंमत दाखवली, म्हणून अवकाशात उपग्रहाचा वेध घेणा-या क्षेपणास्त्राचा ताजा प्रयोग शक्य झालेला आहे. यूपीए वा काँग्रेसच्या सरकारने नेहमीच अशा प्रसंगी शेपूट घातलेली होती. जे भारतीय सेना दलाला पाकिस्तानवर प्रतिहल्ला करण्यापासून रोखतात आणि वैज्ञानिकांना अवकाशातील सुरक्षेचे प्रयोगही करू देत नाहीत, त्यांच्याइतका धोका पाकिस्तान, चीनपासूनही आपल्याला नाही..

मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जवळचा पादचारी पूल कोसळला तरी त्याचा दोष थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी वा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचत असतो. जणू तेच नित्यनेमाने त्या पुलाची पाहणी करून रोजच्या रोज त्याची देखभाल करणारे कर्मचारी असतात. अन्यथा अशा कुठल्याही बाबतीतले दोष त्यांच्या माथी कशाला मारले गेले असते? दिल्लीनजीक दादरी येथे उत्तर प्रदेश पोलिसांची हुकूमत असताना व त्या राज्यात समाजवादी पक्षाचे अखिलेश सरकार सत्तेत असतानाही, अखलाख नावाच्या मुस्लिमाला जमावाने ठार मारले, तर गुन्हेगार पंतप्रधान मोदी असतो. त्यात स्थानिक पोलीस वा ठाणेदार वगैरे कोणी दोषी नसतो. थोडक्यात कुठेही काही विपरित घडले, तर त्यातला आरोपी मोदी असतात. अगदी पुलवामा येथे लष्करी ताफ्यावर हल्ला झाला, तर ५६ इंची छाती म्हणून मोदींना जाब विचारला जातो. जणू त्या प्रत्येक लष्करी तुकडीचा म्होरक्या मोदीच असतात. तिथे काही गफलत झाली, तर गुन्हेगार मोदीच असतात. हे आजकाल पुरोगामी तर्कशास्त्र झाले आहे. पण हीच मोजपट्टी लावायची झाल्यास तिथे काही चांगले वा स्पृहणीय झाले, तर त्याचेही श्रेय मोदींनाच द्यायला नको का? तिथे तत्काळ स्पेशल केस म्हणून तर्कशास्त्र पलटी मारत असते. हवाई दलाने पाकिस्तानात बालाकोटला जाऊन मोठा प्रतिहल्ला केल्यास त्याचे श्रेय मात्र सरकार वा मोदींना असू शकत नाही. तिथे हवाई दल वा सेनादलाची पाठ थोपटायची असते. हा भेदभाव किंवा पंक्तिप्रपंच आता नित्याचा झाला आहे आणि डोळसपणे त्याकडे बघणारी सामान्य जनताही त्यातला भेदभाव समजू लागलेली आहे. त्यामुळेच कालपरवा अवकाशात उपग्रहाचा वेध घेणा-या क्षेपणास्त्राच्या विकासाचे श्रेय मोदींचे आहे, हेही जनता जाणते आणि त्याची ग्वाही देण्यासाठी डीआरडीओ या संस्थेचे माजी प्रमुखही समोर आलेले आहेत.

बुधवारी मोदींनी एका ट्विटद्वारे आपण देशाला महत्त्वाची खबर देणार असल्याची घोषणा केली आणि सगळीकडे खळबळ माजलेली होती. अखेरीस मोदींनी अवकाशात उपग्रह भेदण्याचे तंत्रज्ञान भारताने अवगत केल्याची घोषणा केली आणि तमाम पुरोगाम्यांनी त्याचे श्रेय कसे मोदींना नाही, त्यावर आपली अक्कल पाजळायला सुरुवात केली. पंतप्रधान कार्यालयाचे माजी राज्यमंत्री व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी त्याची ग्वाही देण्यासाठी भाष्य करून आपल्याच पक्षाच्या पायावर धोंडा पाडून घेतला. आधीपासूनच हे तंत्रज्ञान भारतापाशी होते. फक्त त्याची चाचणी केलेली नव्हती, असे सांगून चव्हाण यांनी श्रेय मोदींना नसल्याचा गौप्यस्फोट केला. पण त्यातून खरे श्रेय शास्त्रज्ञांपेक्षाही मोदींना असल्याचे उघड होऊ शकले आहे. कारण ही चाचणी करण्याची कुवत भारतीय वैज्ञानिकांमध्ये खूप आधीपासून होती, पण त्यासाठी लागणारे धैर्य काँग्रेस वा यूपीएच्या सत्ताधा-यांपाशी नसल्याने ती चाचणी होऊ शकलेली नव्हती. ती हिंमत मोदींनी पंतप्रधान म्हणून मिळालेल्या सत्तेच्या बळावर केली आणि म्हणून ही चाचणी होऊ शकली. मोदी सत्तेत येण्यापूर्वी तंत्रज्ञानाची सज्जता होती, तर चाचणी करण्यापासून शास्त्रज्ञांना कशाला रोखण्यात आले होते? त्याचाही खुलासा चव्हाण यांनी करायला हवा होता. पण तो अतिशय अडचणीचा व नामर्दीचा पुरावा असल्याने त्याची वाच्यता चव्हाणांनी केलेली नाही. पण ज्या संघटनेने हा प्रयोग यशस्वी केला, तिचे माजी प्रमुख श्री. सारस्वत यांनी काँग्रेसचे पूर्ण वस्त्रहरण करून टाकलेले आहे. यूपीए काळापासून ही संघटना त्या चाचणीसाठी सरकारकडे आग्रह धरून बसलेली होती. पण मनमोहन वा सोनियांनी तितकी हिंमत दाखवली नाही. यात हिंमतीचा विषय कुठे येतो? त्यावर एकूण प्रयोगाचे श्रेय अवलंबून आहे. यातला प्रयोग शास्त्रीय असला तरी परिणाम चुकीचे झाल्यास येणारी जबाबदारी राजकीय होती. म्हणून काँग्रेसने हिंमत केलेली नव्हती.

उपग्रह सोडणे वा रॉकेट उडवणे असा हा विषय नाही. तिथे उंच अंतरिक्षामध्ये आजकाल हजारो उपग्रहांची गर्दी झालेली असून, त्या गर्दीत कसाबप्रमाणे बेछूट गोळीबार केल्यासारखे क्षेपणास्त्र सोडून उपग्रह नष्ट करता येत नसतो. अवकाशात उपग्रह सोडताना काही गफलत झाली, तर रॉकेटसह ते यान खोल समुद्रात कोसळून पडण्याची सज्जता ठेवलेली असते. त्यामुळे गणित चुकले वा अन्य कुठे चूक झाली, तर आर्यिक नुकसान होते. पण जमिनीपासून दूरची घटना असल्याने स्वदेश वा परदेशाची कुठलीही हानी शक्य नसते. मात्र अंतरिक्षात उपग्रहांच्या गर्दीमध्ये नेमक्या उपग्रहाला लक्ष्य करून त्याचा भेद करण्यात चूक झाली; तर जगातल्या अन्य कित्येक देशांच्या उपग्रहांचे नुकसान होऊ शकते. त्या गर्दीतल्या एकालाही धक्का लागला आणि तो कक्षेतून ढळला, तर इतर कुठल्या उपग्रहांना धक्के देत मोठय़ा साखळी घटनाक्रमाचा धोका संभवतो. त्यामुळे जगाच्या रोषाला भारताला सामोरे जाण्याची वेळ येऊ शकते. ती प्रतिक्रिया वैज्ञानिक वा शास्त्रीय नसून राजकीय असते. म्हणूनच अशा प्रयोग वा संशोधनात विज्ञानापेक्षाही राजकीय निर्णय व हिंमतीला, कुवतीला महत्त्व असते. तितकी हिंमत यूपीए व मनमोहन सरकारमध्ये नव्हती, म्हणूनच तंत्रज्ञान सज्ज असूनही यूपीए किंवा मनमोहन यांच्यासारखे सत्ताधीश शेपूट घालून बसलेले होते. जे ताज्या प्रयोगाचे आहे, तेच हवाई हल्ल्याचेही झालेले होते. तेव्हाही भारताचे हवाई दल कसाबच्या हत्याकांडाचा बदला घेण्यासाठी सज्ज होते. पण मनमोहन सरकार शेपूट घालून बसलेले होते. सर्जिकल स्ट्राईकही राजकीय निर्णय होता. सवाल तंत्रज्ञान सज्ज असण्याचा नसतो व नव्हता, राजकीय हिंमतीचा होता आणि अशावेळी यूपीए वा काँग्रेसच्या पुरोगामी सरकारने नेहमीच शेपूट घातलेली होती. मोदी सरकारने राजकीय हिंमत दाखवली, म्हणून हे हल्ले वा ताजा प्रयोग शक्य झालेला आहे. म्हणूनच श्रेय हिंमतीचे आहे तंत्रज्ञानाचे नाही.

त्या शोले सिनेमातला ठाकूर जसा समोर पडलेली बंदूक उचलत नाही, त्यापेक्षा असे मनमोहन वा यूपीएचे सत्ताधीश वेगळे नसतात. सवाल बंदुकीचा नसतो. ती हातात घेऊन झाडण्यासाठी हात हवे असतात आणि ठाकूरचे दोन्ही हात छाटलेले असतात. यूपीए किंवा काँग्रेस सरकार म्हणजे शोलेतला बिनहाताचा ठाकूर होता, असेच आता पृथ्वीराज चव्हाण सांगत नाहीत काय? डीआरडीओचे तेव्हाचे प्रमुख सारस्वत यांनी म्हणून समोर येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी व सुरक्षा सल्लागार अजित डोबाल यांची पाठ थोपटली आहे. ते सर्वात मोठे श्रेय किंवा प्रमाणपत्र आहे.

ज्याचे श्रेय तमाम पुरोगामी लोक शास्त्रज्ञ वैज्ञानिकांना देऊन बसले आहेत, तेच श्रेय त्या शास्त्रज्ञांचे प्रतिनिधी सारस्वत मोदींना देत आहेत. किंबहुना यूपीए सरकार कसे नामर्द होते आणि मोदींची छाती ५६ इंची असल्यानेच हा प्रयोग शक्य झाल्याची ग्वाही सारस्वत देत आहेत ना? यापेक्षा पुरोगामी बेशरमपणाचा आणखी कुठला पुरावा देण्याची गरज आहे? मोदी यशाने व द्वेषाने ही माणसे इतकी पिवळी झालेली आहेत की, काविळीलाही तांबडी वा हिरवी ठरवण्यापर्यंत त्यांची मजल गेलेली आहे. महाभारतातली द्रौपदी तरी दु:शासनाच्या पापामुळे वस्त्रहरणात फसलेली होती. हे लोक आपणच वस्त्रहरणाला सज्ज होत असतात किंवा जगासमोर नग्न व्हायला उतावळे झालेले असतात. अन्यथा हा विषय टाळता आला असता ना? मोदींनी कुठेही याचे श्रेय आपल्याला घेतले नव्हते की, मागितले नव्हते. पुरोगाम्यांनी फुसक्या सोडल्या नसत्या आणि श्रेयाचा विषय काढला नसता, तर त्यांचे इतके वस्त्रहरण नक्कीच झाले नसते. मोदींच्या ५६ इंची छातीचा व हिमतीचा इतका सज्जड पुरावा समोर आला नसता; किंबहुना अशा वादातून आपण देशासाठी कसे घातक आहोत आणि आपल्याला सरकारमध्ये आणून बसवणे म्हणजे देशाच्या सुरक्षेला शत्रूच्या हाती सोपवणे आहे. त्याचीच ग्वाही यातून काँग्रेस व पृथ्वीराज चव्हाणांनी दिलेली आहे. इथे एक गोष्ट गंभीरपणे लक्षात घेतली पाहिजे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला दिलेला महत्त्वाचा संदेश, त्यापुढे अतिशय दुय्यम मानावा लागेल. त्यापेक्षाही महत्त्वाचा संदेश पृथ्वीराज चव्हाण व सारस्वत यांच्या विधानात एकत्र आलेला आहे. बुधवारी ज्या संघटनेने उपग्रह भेद यशस्वी केला, त्याचे माजी प्रमुख सारस्वत होते आणि त्यावेळी पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण होते. त्यांच्या दाव्यांचा एकत्रित विचार केल्यास, त्यातून काय इशारा देण्यात आला आहे? तर यूपीए, काँग्रेस वा तत्सम कोणीही सत्तेत असला वा आणला गेला, तर देशाच्या सुरक्षेला मोठा धोका आहे. हे लोक सत्तेत आल्यावर देशाची सुरक्षा लुळीपांगळी करून टाकतील. देशाच्या सेनेला वा सुरक्षा यंत्रणांना कुठलीही सज्जता करू देणार नाहीत. तिच्याशी नको तो खेळ करतील. नेमका संदेश इतकाच आहे की, काँग्रेस व यूपीएपासून देशाला व पर्यायाने इथल्या जनतेच्या जीवाला धोका आहे. पाकिस्तान वा चीनसारखे शत्रू दूरचे आहेत. काँग्रेस किंवा पुरोगामी म्हणवणारे हे भारताचे सर्वात जवळचे शत्रू असल्याचा हा संदेश आहे. कारण, मोदींना कुठले श्रेय मिळणे वा न मिळणे, ही दुय्यम व किरकोळ बाब आहे. मोदींनी निवडणुका जिंकण्यापेक्षाही देशाची सुरक्षा मोठी असून पुरोगामी काँग्रेस सत्तेत येणे अधिक घातक आहे. सध्या तरी मोदीच अशा शत्रूंपासून देशाला सुरक्षित राखू शकतात. इतकाच इशारा सारस्वत व पृथ्वीराज चव्हाण यांनी संयुक्तपणे दिलेला आहे. जे भारतीय सेना दलाला पाकिस्तानवर प्रतिहल्ला करण्यापासून रोखतात आणि वैज्ञानिकांना अवकाशातील सुरक्षेचे प्रयोगही करू देत नाहीत, त्यांच्याइतका धोका पाकिस्तान, चीनपासूनही आपल्याला नाही. मोदी एका प्रचारसभेत आपली छाती ५६ इंचाची असल्याचे म्हणाले होते. आता या दोन्ही मोठय़ा लोकांनी त्याचे पुरावेच आपापल्या दाव्यातून दिलेले नाहीत काय?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here