प्रहार वेब टीम

सांगली : आम्हाला सवतीचे पोर समजू नका. जयंत पाटील यांच्याबाबत बोलताना दक्षता घ्या. नागाचा फणा ठेचून काढण्यासाठी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते समर्थ आहेत. झारीतले शुक्राचार्य कोण आहेत याचा खुलासा करा. नाहीतर खाऊन जाईल गाव आणि नाव येईल जयंत पाटलांवर, असे खडे बोल राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगली लोकसभेचे काँग्रेस आघाडीचे उमेदवार विशाल पाटील यांना सुनावले.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या नियोजनासाठी राष्ट्रवादीच्या सांगलीतील नगरसेवक, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक राष्ट्रवादी भवनात पार पडली. विशाल पाटील या बैठकीला उपस्थित होते. त्यात राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त करत विशाल पाटील यांच्यावर निशाणा साधला.

काँग्रेसच्या डावपेचांमुळे राष्ट्रवादीचे पदाधिकारी नाराज आहेत. आपल्या चुकांमुळे महापालिका हातातून गेली आहे. दोन्ही कार्यकर्त्यांनी झाले गेले विसरून कामाला लागावे. उलटे काम करून जयंत पाटील यांचे नाव खराब करू नका असे आवाहन काही कार्यकर्त्यांनी केले.

जयंत पाटील यांचा आदेश आला आहे. त्यामुळे आम्ही आघाडीचेच काम करणार आहोत. मनात शंका ठेऊ नका. पण चुकून काही बरे वाईट झालेच तर जयंत पाटलांमुळे झाले, असे सांगू नका, असा सल्लाही पदाधिकाऱ्यांनी विशाल पाटील यांना दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here